आळेफाटा परिसरात गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
आळेफाटा परिसरात गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
आळेफाटा (प्रतिनिधी) -आळेफाटा - संतवाडी(ता. जुन्नर )रस्त्यावर गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ऋषिकेश गणेश पाडेकर (वय 26, रा. संतवाडी, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी अवैध शस्त्रांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हेचे पथक जुन्नर भागात गस्त घालत असताना, संतवाडी रोडवर एक इसम कमरेला कट्टा लावून उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष झडती घेतली असता कट्टा व काडतुसे मिळून आली.
याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विश्वास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे व पथकाने केली.

No comments: