Header Ads

प्रा. कवी प्रकाश पाटील यांच्या ‘कातळाखालचं पाणी’ काव्यसंग्रहाला संत नामदेव राष्ट्रीय काव्य साहित्य पुरस्कार जाहीर

 प्रा. कवी प्रकाश पाटील यांच्या ‘कातळाखालचं पाणी’ काव्यसंग्रहाला संत नामदेव राष्ट्रीय काव्य साहित्य पुरस्कार जाहीर

चिंचवडेच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव ; २६ नोव्हेंबरला हिंगोलीत पुरस्कार वितरण.

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

९५९५३१६२६६


कुडित्रे (ता. करवीर) येथील डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजचे प्रा. कवी प्रकाश पाटील यांच्या कातळाखालचं पाणी’ या काव्यसंग्रहाची उत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्दल ‘संत नामदेव राष्ट्रीय काव्य साहित्य पुरस्कार - २०२६’ साठी निवड झाली आहे.

समृद्धी प्रकाशन संस्था, हनुमान नगर, हिंगोली (मराठवाडा) चे संयोजक तथा शिवाजी महाविद्यालय, हिंगोलीचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी या पुरस्काराचे निवडपत्र जाहीर केले आहे. या पुरस्काराचे मानपत्र वितरण २६ नोव्हेंबर २०२६ रोजी हिंगोली येथे करण्यात येणार आहे.

शिवार आणि ग्रामदर्शनाची अनुभूती देणाऱ्या ‘कातळाखालचं पाणी’ या काव्यसंग्रहात शेती आणि शेतकरी जीवन, बदलत चाललेला जीवनकाळ, पर्यावरणशीलतेतून प्रदूषणाकडे चाललेला मानवी प्रवास आणि अध्ययन-अध्यापनातून जडलेली संत साहित्याची गोडी अशा विविध विषयांची सखोल बांधणी करण्यात आली आहे. या काव्यसंग्रहातील ‘बाप माझा’ या कवितेची २०२६ मध्ये सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड झाली होती, ही विशेष बाब आहे.

प्रा. प्रकाश पाटील यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापूरे बहुउद्देशीय संस्था, महागाव (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार - २०२४’ त्यांच्या याच काव्यसंग्रहाला मिळाला आहे. याशिवाय त्यांच्या ‘अंधार वाटेवर’ आणि ‘नभांगण’ या काव्यसंग्रहांनाही राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

राज्यस्तरीय पुरस्कारानंतर आता राष्ट्रीय स्तरावरील ‘संत नामदेव राष्ट्रीय काव्य साहित्य पुरस्कार’ त्यांच्या ‘कातळाखालचं पाणी’ या संग्रहाला जाहीर झाल्याने त्यांच्या साहित्य कारकिर्दीला मोठी बळकटी मिळाली आहे. त्यांच्या साहित्य कृतीला मिळालेला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असल्याने शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.