गुंडेवाडीतील खुनाचा अवघ्या काही तासांत उलगडा! तरुणासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई.
गुंडेवाडीतील खुनाचा अवघ्या काही तासांत उलगडा! तरुणासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई
जुन्या भांडणाचा राग मनात धरून सुनील उर्फ सोन्या खांडेकर यांची हत्या केल्याचा संशय; चाकू-कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती.
गुंडेवाडी | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.
राजू कदम.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे झालेल्या खुनाच्या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी अनिरुद्ध सिद्धू कांबळे (वय १९) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी मिळून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमकी घटना काय?
सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) रात्री सुमारे ८.४९ वाजण्याच्या सुमारास गुंडेवाडी येथील सातपुते मळा परिसरात, ग्रीनहाऊसजवळ ही घटना घडली. सुनील उर्फ सोन्या तानाजी खांडेकर (वय ३१) हे जेवण करून बेदवस्ती रस्त्याने शेताकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी चाकूसदृश धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, पोटावर, पाठीवर, पायावर आणि कपाळावर वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
अंकली फाटा–हरिपूर रस्त्यावरून आरोपी ताब्यात!
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी तपासासाठी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी तीन पथके तयार केली.
दरम्यान, आरोपी अंकली फाटा ते हरिपूर रस्त्यावर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत अनिरुद्ध कांबळे याला ताब्यात घेतले.
जुन्या वादातून हत्या केल्याची कबुली?
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत सुनील खांडेकर आणि संशयित आरोपी यांच्यात वारंवार भांडणे होत होती. याच रागातून आरोपी आणि त्याच्या मित्राने सुनील यांच्यावर पाळत ठेवली आणि ते घरातून शेताकडे जात असताना चाकू व कोयत्याने वार केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक अमित पाटील पुढील तपास करीत आहेत.

No comments: