ओतूर : सोयाबीन चोरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, ३,१९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
ओतूर : सोयाबीन चोरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, ३,१९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त..
आळेफाटा (प्रतिनिधी)ओतूर(ता. जुन्नर )येथे सोयाबीन चोरी करताना एका चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले असून, ३,१९,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.२८ रोजी पहाटे ३.३० वाजता मौजे जाकमाथा, ओतूर येथे श्री. जयसिंग शंकर शेटे यांच्या राहत्या घराजवळील कांदा चाळीत ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या काही इसम पांढऱ्या रंगाच्या छोटा हत्ती गाडी नंबर एम.एच. १४ के.जी. ५६९६ मध्ये टाकत असताना त्यांना दिसून आले. त्यांनी शेजाऱ्यांना तसेच पोलिसांच्या आपत्कालीन डायल ११२ नंबरवर संपर्क करून माहिती दिली.
सदर ठिकाणावरून तीन चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. घटनास्थळी सर्वेश संतोष बटवाल, वय २० वर्षे, व्यवसाय शेती, रा. नेतवड माळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे हा जागीच मिळून आला आहे.
जयसिंग शंकर शेटे, रा. जाकमाथा, ओतूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ओतूर पोलीस स्टेशनला १) सर्वेश संतोष बटवाल, २) अरबाज रज्जाक शेख, रा. डिंगोरे, ता. जुन्नर, ३) साहील रेवननाथ शिंदे, रा. डिंगोरे, ता. जुन्नर, ४) कार्तिक बोटे, रा. गणपती फाटा, नेतवड, ता. जुन्नर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार बाळशिराम भवारी हे करत असून, आरोपीच्या ताब्यात मिळून आलेले वाहन व चार सोयाबीनचे कट्टे असा मिळून ३,१९,२०० रुपये किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी सर्वेश संतोष बटवाल यास दि. २८ रोजी अटक करून ५ दिवस पोलीस कोठडी मिळणेकामी जुन्नर न्यायालयासमोर हजर केले असता,न्यायालयाने सदर आरोपीस ३ दिवस पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी व त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यातील स्पोर्ट बाईकचा शोध घेणेकामी दोन पथके तयार करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध चालू आहे.
सदर आरोपींनी मौजे आलमे येथील सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याबाबत ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून, गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे,जुन्नर उपविभागीय पोलीस धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे,पोलीस हवलदार बाळशिराम भवारी, दिनेश साबळे यांनी केली आहे.

No comments: