Header Ads

सांगली जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी!

 सांगली जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ७ ते ८ जिल्हा न्यायालयांना ई-मेल; न्यायालय परिसर तातडीने रिकामा

न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले; बॉम्ब शोधक पथक अन् श्वान पथकाकडून कसून तपासणी सुरू



सांगली | प्रतिनिधी

सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा निनावी ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालयीन वर्तुळासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, सांगलीसह महाराष्ट्रातील ठाणे, सातारा, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोलीसह जवळपास ७ ते ८ जिल्हा न्यायालयांना एकाच वेळी अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

न्यायालय परिसर तातडीने रिकामा

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच सांगली न्यायालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने न्यायालय परिसर रिकामा केला. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या प्रकारामुळे न्यायालयाचे नियमित कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले.

BDDS आणि श्वान पथकाकडून तपासणी

घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाच्या मदतीने न्यायालयाची इमारत आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

एकाच वेळी अनेक न्यायालयांना धमकी; ई-मेल पाठवणारा कोण?

महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल आल्याने या प्रकाराकडे पोलीस यंत्रणा गांभीर्याने पाहत आहे. हा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्यामागील उद्देश काय आणि धमकीमध्ये काही तथ्य आहे का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, तपास पूर्ण होऊन पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर येईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.