दत्तवाडमध्ये अवैध मटका व्यवसायाची चर्चा; खुलेआम आकड्यांचा खेळ सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
दत्तवाडमध्ये अवैध मटका व्यवसायाची चर्चा; खुलेआम आकड्यांचा खेळ सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
कारवाईचा धाक उरला नाही का? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; उपोषणाचा इशारा...
दत्तवाड | प्रतिनिधी
दत्तवाड गावात अवैध मटका जुगार सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. गावातील विविध चौकांमध्ये खुलेआम आकडे लिहून घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा प्रकार खरोखरच सुरू असेल, तर संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
अवैध मटका जुगाराच्या विळख्यात तरुणाई आणि कष्टकरी वर्ग अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. पैशांच्या आमिषातून काहींचे आर्थिक नुकसान होत असून, कुटुंबांवरही त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ किरकोळ अवैध धंदा म्हणून न पाहता सामाजिक समस्येच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, गावात अशा प्रकाराची चर्चा होत असताना संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या व्यवसायाला कोणाचे अभय आहे का? या प्रकारामागे नेमके कोण कार्यरत आहे? याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पोलीस प्रशासनाने दत्तवाड परिसरात गोपनीय पद्धतीने तपासणी करून अवैध मटका जुगार सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच या व्यवसायाला आर्थिक किंवा अन्य प्रकारे मदत करणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा प्रकार थांबवला नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आता प्रश्न एकच... दत्तवाडमधील अवैध मटका व्यवसायाच्या चर्चेची पोलीस प्रशासन दखल घेणार का? की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार?

No comments: