Header Ads

साडेतीन लाखांत नवजात बाळाचा सौदा! २४ दिवस पोलिसांना गुंगारा देणारे डॉ. भोजने दाम्पत्य अखेर जेरबंद!

 साडेतीन लाखांत नवजात बाळाचा सौदा! २४ दिवस पोलिसांना गुंगारा देणारे डॉ. भोजने दाम्पत्य अखेर जेरबंद!

अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून बाळ विक्रीचा कथित व्यवहार; मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.


अमरावती | पी. एन. देशमुख

अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बाळाचा तब्बल साडेतीन लाख रुपयांत विक्रीचा कथित सौदा केल्याच्या गंभीर प्रकरणात गेल्या २४ दिवसांपासून फरार असलेल्या डॉ. वैशाली भोजने (वय ४९) आणि त्यांचे पती प्रफुल्ल वसंतराव भोजने (वय ५६, रा. बुटी प्लॉट, राजापेठ, अमरावती; मूळ गाव हिवरखेड, ता. मोर्शी) यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करण्यात आल्याचा आणि नवजात बाळाच्या विक्रीचा कथित व्यवहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात अल्पवयीन मुलीच्या साडेसोळा वर्षीय प्रियकरासह डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. अल्पवयीन प्रियकराला ताब्यात घेऊन बालगृहात पाठविण्यात आले, तर एका सहआरोपी डॉक्टरला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, भोजने दाम्पत्य पोलिसांना चकवा देत २४ दिवसांपासून फरार होते.

दरम्यान, भोजने दाम्पत्य साईनगर-अकोली परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणेदार रवींद्र राजुनवार यांच्या आदेशाने डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, डीबी पथक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा रचला. संशयितांची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणून अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश बोला आणि पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पवार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे व त्यांच्या पथकाने केली.

अल्पवयीन मुलीच्या शोषणासह नवजात बाळाच्या कथित विक्रीचा हा गंभीर प्रकार समोर आल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.