मोबाईल हरवले, पण मिरज ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले! ४.३५ लाखांचे २० मोबाईल नागरिकांना परत
मोबाईल हरवले, पण मिरज ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले! ४.३५ लाखांचे २० मोबाईल नागरिकांना परत
वेगवेगळ्या राज्यांतून तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईल हस्तगत; २०२६ मध्ये आतापर्यंत ४८ गहाळ मोबाईलचा शोध.
मिरज | प्रतिनिधी
मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळण्याची आशा अनेकजण सोडून देतात; मात्र मिरज ग्रामीण पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आणि राज्यांत गहाळ झालेले तब्बल ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २० मोबाईल शोधून ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत. मिरज ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी यासाठी स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाने मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत विविध ठिकाणांहून २० मोबाईल शोधून हस्तगत केले. त्यानंतर हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
विशेष म्हणजे, २०२६ या वर्षात मिरज ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४८ गहाळ मोबाईलचा शोध लावला आहे. यापैकी काही मोबाईल यापूर्वीच नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यादव आणि पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे यांनी सहभाग घेतला.
हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन तो पुन्हा नागरिकांच्या हातात देण्याच्या या कामगिरीमुळे मिरज ग्रामीण पोलिसांनी केवळ मोबाईलच परत मिळवून दिले नाहीत, तर पोलिसांविषयीचा नागरिकांचा विश्वासही अधिक दृढ केला आहे.

No comments: