Header Ads

आरमोरीत अमृत २.० पाणीपुरवठा योजनेत अवैध रेतीचा वापर?

 आरमोरीत अमृत २.० पाणीपुरवठा योजनेत अवैध रेतीचा वापर? 

👉 विना-रॉयल्टी आणि मातीमिश्रित रेतीमुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! 

👉 तहसीलदारांनी रेती तस्करांना  अभय दिले का ❓ 


गडचिरोली ( चक्रधर मेश्राम), २५ नोव्हेंबर २०२६:-  

आरमोरी शहरातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत २.० पाणीपुरवठा योजनेच्या कामात अवैध, विना-रॉयल्टी तसेच मातीमिश्रित रेतीचा वापर होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांनी तहसीलदार आरमोरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी गडचिरोली यांनाही देण्यात आली आहे.

नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा प्रकार?

अमृत २.० योजनेअंतर्गत आरमोरी शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, या कामासाठी वापरण्यात येणारी रेती अवैध, विना-रॉयल्टी आणि मातीमिश्रित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असेल, तर भविष्यात या योजनेच्या कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाचा निधी खर्च करून नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याची योजना उभारली जात असताना त्यामध्येच नियमांचे उल्लंघन होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित योजनेतच अशा प्रकारचा निष्काळजीपणा कसा काय खपवून घेतला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.केवळ कागदोपत्री कारवाई नको, प्रत्यक्ष तपासणी करा!

संबंधित कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून रेतीचा दर्जा, वाहतूक, रॉयल्टी पावत्या आणि रेतीच्या उगमाची तपासणी करण्यात यावी. तसेच संबंधित कंत्राटदाराकडून रेती खरेदी व वाहतुकीची संपूर्ण कागदपत्रे मागवून त्यांची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रज्ञा निमगडे यांचा प्रशासनाला थेट सवाल!

अमृत २.० ही नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित महत्त्वाची योजना आहे. अशा योजनेतच जर अवैध आणि निकृष्ट साहित्य वापरले जात असेल, तर भविष्यात कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार? शासनाचा पैसा खर्च होऊनही नागरिकांना निकृष्ट दर्जाचे काम मिळणार असेल, तर याला जबाबदार कोण?

प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निष्पक्ष चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. अन्यथा या प्रकरणाचा पाठपुरावा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही प्रज्ञा चेतन निमगडे यांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.