टोपजवळ भीषण अपघात : विवाहित तरुणी जागीच ठार, युवक गंभीर; दिड वर्षाचा मुलगा चमत्कारिकरीत्या बचावला!
टोपजवळ भीषण अपघात : विवाहित तरुणी जागीच ठार, युवक गंभीर; दिड वर्षाचा मुलगा चमत्कारिकरीत्या बचावला!
---------------शशिकांत कुंभार .
----------------
पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील टोप येथील बिरदेव मंदिराजवळ बुधवारी रात्री घडलेल्या थरारक अपघातात बुवाचे वठार येथील विवाहित तरुणीचा जागीच मृत्यू, तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे या भीषण धडकेतही दिड वर्षांचा चिमुकला मुलगा चमत्कारिकरित्या बचावला.
हा अपघात रात्री ९.३० च्या सुमारास घडला. भरधाव वेगातील ट्रक (क्रमांक MH 12 QG 8213) ने मोटरसायकलला मागून भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की सोनाली शुभम कांबळे (वय 26, रा. बुवाचे वठार, ता. हातकणंगले) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मोहसीन पिंजारी गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून ट्रक चालक फरार; पोलिसांचा दमदार पाठलाग
अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रकसह पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिरोली पोलिसांनी अलर्ट राहून कामेरी येथील पेट्रोल पंपावर चालकाला ट्रकसह जेरबंद केले. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आठ दिवसांपूर्वी आली होती वास्तुशांतीला; परतीच्या प्रवासात मृत्यूने घेतली करवत
माहितीनुसार, सोनालीचे माहेर टेंबलाईवाडी, कोल्हापूर येथे आहे. मावशीच्या नव्या घराच्या वास्तुशांतीनिमित्त ती आठ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. कार्यक्रम उरकून ती परत घरी जात असताना हा अपघात घडला.
सोनाली तिच्या पतीच्या आत्याचा मुलगा रोहन राजू कांबळे याची पत्नी आणि दिड वर्षाचा मुलगा सार्थक यांच्यासोबत निघाली होती. वाटेत मोहसीन भेटल्याने सोनाली त्याच्या मोटरसायकलवर बसली. पुढे टोपजवळील वळणावर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना उडवले.
चिमुकला सार्थक चमत्कारिकरीत्या बचावला
अपघाताच्या वेळी सार्थक हा रोहनच्या पत्नीजवळ असल्याने धडकेपासून वाचला. त्याच्या जिवंत बचावाने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. पण या अपघाताने त्याचे मातृत्व हिरावले.
नियतीचा क्रूर आघात : पाच वर्षांचा संसार उद्ध्वस्त
सोनाली आणि शुभम यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. शुभम हा पेठवडगावातील कापड दुकानात काम करून संसाराचा गाडा ओढत होता. मुलगा सार्थकचा पहिला वाढदिवस एप्रिलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. मात्र अचानक झालेल्या अपघाताने शुभमवर दु:खाचा पर्वत कोसळला.
शिरोली पोलिसांची तत्पर कारवाई
अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून ट्रकचा शोध सुरू केला आणि काही तासांत चालकाला पकडून ट्रक जप्त केला. गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा करण्यात आली.

No comments: