माले फाट्यावर भीषण अपघात : इनोव्हा कार पलटी, २२ वर्षीय विद्यार्थिनी ठार
माले फाट्यावर भीषण अपघात : इनोव्हा कार पलटी, २२ वर्षीय विद्यार्थिनी ठार
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप.
कोल्हापूर–सांगली रस्त्यावर माले फाट्याजवळ आज सकाळी भीषण अपघातात इनोव्हा कार तीन वेळा पलटी होऊन २२ वर्षीय विद्यार्थिनी दिव्या कानिफनाथ भोसले (रा. राजारामपुरी, कोल्हापूर – मूळ नानज, सोलापूर) हिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिची मैत्रीण देविका भुते गंभीर जखमी असून कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कारचा चालक ‘वजनदार’ व्यक्ती असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून मृतदेह ताब्यात घेण्यासही त्यांनी नकार दिला होता.
---
अपघाताची भीषणता : इनोव्हा हवेत उडून तीन वेळा पलटी
आज सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी असे चार जण भाड्याने घेतलेल्या MH-10-DW-0700 या इनोव्हा कारमधून घोडावत विद्यापीठातील परीक्षेसाठी निघाले होते. परीक्षा आटोपल्यानंतर देविका भुते हिच्या वाढदिवसासाठी बाहेर जाण्याचा त्यांचा बेत होता.
कारचालक ईशान धुमाळ हा इनोव्हा अतिवेगात चालवत सांगली रोडकडे निघाला होता.
दरम्यान MH-09-EM-6290 हा छोटा हत्ती टेम्पो स्क्रॅपच्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्या भरून माले फाट्यावरील पुलाशेजारी उभा होता. त्याचा चालक विशाल गोसावी हा ओढ्याकाठी बाटल्या गोळा करण्यास गेला होता.
याचवेळी भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने छोटा हत्तीला प्रचंड जोरात मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार हवेत उडून अक्षरशः तीन वेळा पलटी झाली. रस्त्यावर काचांचे ढीग पसरले होते आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली.
---
गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात हलविले – दिव्याचा मृत्यू
अपघातात दिव्या भोसले व देविका भुते या गंभीर जखमी झाल्या. दोघींनाही तात्काळ कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दिव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देविका भुते हिची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.
पोओओओओओलिसांवर नातेवाईकांचा गंभीर आरोप
अपघातानंतर नातेवाईक हातकणंगले पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना हाकलून लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
इनोव्हा चालक ईशान धुमाळ हा ‘बडे प्रस्थ’ असल्याने वरिष्ठांचा दबाव येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
या विरोधात नातेवाईकांनी दिव्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला होता. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी असून विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

No comments: