Header Ads

कृष्णात सोनार यांच्या "एक्झिट " ने संपूर्ण धामणीखोरा हळहळला.

 कृष्णात सोनार यांच्या "एक्झिट " ने संपूर्ण धामणीखोरा हळहळला.

--------------------------

कळे प्रतिनिधी 

सुनिल मोळे

----------------------------

  कळे:- पणोरे (ता.पन्हाळा) येथील 

एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,माणसात देव शोधणारा माणूस, धार्मिक आवड जपणारा, गोरगरिबांच्या कोणत्याही अडचणी साठी नेहमी तत्पर असणारा अवलिया, आजच्या तरुण पिढीला आदर्शवत असणारे,गेली अनेक वर्षे नुसत्या बुलेटच्या आवाजावरुन त्यांना संपूर्ण धामणीखोरा ओळखत होता असे कृष्णात विष्णु सोनार वय ५२.दत्त भक्त असणारे कृष्णात सोनार हे ऐन दत्त जयंती दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याने सारा गाव हळहळत असून संपूर्ण धामणीखोरा शोकसागरात बुडाला आहे.


      पणोरे हे धामणी खोऱ्यातील एक सधन गाव आहे. याच गावातील कृष्णात सोनार गेल्या अनेक वर्षापासून कुंभी - कासारी साखर कारखान्यात कार्यरत होते. पहिल्यापासूनच सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.काही वर्षी त्यांनी गावचे उपसरपंचपद ही भूषविले होते.सध्या ते शिवसेना शिंदे गटाचे वेतवडे पंचायत समिती विभाग प्रमुख या पदावर कार्यरत होते.

        गावात सर्व सामान्यांच्या बरोबर मिळून मिसळून राहणारे सतत हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे राहणारे कृष्णात सोनार हे भजन गायक तसेच श्री दत्ताचे भक्त होते. भजन म्हणताना आवाज तर इतका गोड की ऐकणाऱ्याने फक्त ऐकतच राहावे. पहिल्यापासूनच कपाळाला अष्टगंधाचा टिळा व बुलेट मोटरसायकल वरून त्यांचे धामणीखोऱ्यात नित्याचे वावरणे असायचे.शेतीसाठी एप्रिल - मे महिन्यात पाणीटंचाई निवारणाकरीता आंबर्डे बंधाऱ्यावर बसविण्यात येणाऱ्या विद्युत पंप योजनेकरीता ते नेहमी पुढे असायचे.शेतकरी जगला पाहिजे हा एकमेव ध्यास त्यामुळे त्यांचे शेतकरी वर्गाकडून नेहमी कौतुक होत होते.

       त्यांच्या बुलेटमुळे ते परिसरात चांगलेच ओळखले जायचे पण कधीही ते रिकामे जात नसत भागात एस.टी बस सेवा कमी असल्याने ते नेहमी शाळेची मुले, नागरिक,तरुण, वृध्द यांना आपल्या गाडीवर घेऊनच येणार किंवा जाणार.

 त्यामुळे त्यांना जनसामान्य नागरिक चांगलेच ओळखत होते.परोपकरी वृत्ती व प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार तयार झाला होता. तसेच कुंभी - कासारी कारखान्यावर कॉलेज निमित्त काही विद्यार्थी राहत होते त्यांना त्यांचा मोठा हातभार लागायचा.

        वर्षभरात सतत स्वामी समर्थ व दत्त भक्तीत रमणारे व भजन करणारे कृष्णा सोनार हे दत्त जयंती दिवशी गावातील मंदिरात भजन करून रात्री गावात तरुणांनी आयोजित केल्या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते.या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते खाली कोसळले. उपस्थित तरूणांनी त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला दवाखान्यात हलवले.मात्र सर्वच प्रयत्न व्यर्थ ठरले आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कृष्णात सोनार यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी संपूर्ण धामणीखोऱ्यात पसरली.आणि सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली.लोकांचा विश्वासच बसत नव्हता, मनाला चटका लावणारी घटना घडली होती. मृत्यू अटळ असतो.पण चांगल्या लोकांच्या स्मृती नेहमी मागे राहतात.एका परोपकारी व्यक्तीचे निधन झाल्यावर समाजात मोठी हळहळ पसरते, कारण अशा व्यक्ती समाजासाठी मोठे योगदान देतात; त्यांच्या निधनाने त्यांचे कार्य, त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीची आठवण येते, ज्यामुळे शोक व्यक्त केला जातो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना केली जाते.जसे की कृष्णात सोनार यांच्या विषयी झाले.

संपुर्ण धामणीखोरा हळहळला एकही मोबाईल असा नव्हता की ज्याचा कृष्णात सोनार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा स्टेटस नव्हता. व्हॉट्स ॲप वर तर ज्याच्या त्याच्या परीने आपल्या लाडक्या कृष्णातदाच्या विषयी लिहून मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात येत होती.वाघासारखा माणुस पण काळीज मात्र खुपचं प्रेमळ , कोणत्याही गटाचा माणुस असुदे कधीही कोणाचा द्वेष नाही की मत्सर नाही. प्रेमळ असले तरी कुठे अन्याय होत असेल तर तितकेच परखड मत मांडणारे व्यक्तिमत्व, परोपकारी व चांगल्या स्वभावामुळे येथील तरुणांच्या गळ्यातील ताईत समजले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णातदादा.त्यांचे सर्वात जवळचे यशवंत,राजु,नितिन ,गोरख ,प्रविण यासारखे मित्र आपल्या कृष्णातदाला पोरके झाल्याने त्यांच्या दुःखाला पारावार नाही.

 "जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला."असे म्हटले जाते. पण परमेश्वराला इतक्या लवकर ते आवडतील आणि आपल्या लाडक्या कृष्णातदाचे निधन होईल असे कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळेच पणोरेसह संपूर्ण धामणी खोऱ्यात सर्वांच्याच हृदयावर आघात करून गेलेल्या कृष्णात सोनार यांच्या मृत्यू विषयी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली ठिकठिकाणी वाहण्यात येत आहे.अशा या अवलियास कोटी कोटी प्रणाम!!

No comments:

Powered by Blogger.