कोल्हापूर-सांगली रोडवर ऊसाची ट्रॉली पलटी; वाहतुकीस मोठा अडथळा, जीवितहानी टळली
कोल्हापूर-सांगली रोडवर ऊसाची ट्रॉली पलटी; वाहतुकीस मोठा अडथळा, जीवितहानी टळली .
संस्कार कुंभार
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील मजले गावाजवळ कोल्हापूर-सांगली रस्त्यावर रात्री ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. अपघातानंतर ऊसाच्या कांड्या संपूर्ण रस्त्यावर विखुरल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे मोठ्या ट्रॉलींची वाहतूक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पलटी झालेल्या ट्रॉलीतील ऊस बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलीस व स्थानिक नागरिकांना मोठी मेहनत घ्यावी लागली.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर ऊस हटवण्याचे काम तातडीने करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग केंद्राच्या वाहतूक पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉली चालकांना विशेष सूचना दिल्या आहेत. वाहन अति वेगाने चालवू नये, तसेच इतर वाहनचालकांनी अशा मोठ्या ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, ट्रॅक्टर-ट्रॉलींवर ‘रिफ्लेक्स बॅनर’ व रेडियम पट्ट्या लावणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी या उपाययोजना अत्यावश्यक असल्याचेही सुचना त्यांनी दिल्या.

No comments: