गांधीनगर पोलिसांना न्यायालयाचा झटका एमडी ड्रग प्रकरणातील छापा बेकायदेशीर; दोन्ही आरोपींना मुक्त करण्याचे आदेश.
गांधीनगर पोलिसांना न्यायालयाचा झटका
एमडी ड्रग प्रकरणातील छापा बेकायदेशीर; दोन्ही आरोपींना मुक्त करण्याचे आदेश.
----------------------------------
शशिकांत कुंभार
-----------------------------------
दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत गांधीनगर पोलिस ठाणे हद्दीतील उचगाव येथील महामार्ग पुलाजवळ कारवाई करून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग असा अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा केला होता.
या प्रकरणी अटकेनंतर दोन्ही आरोपींना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोल्हापूर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी पोलिस आणि सरकारी वकिलातर्फे आरोपींची ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, आरोपींच्या वतीने ॲड. अभिजीत पाटील व ॲड. दीपक पिंपळे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी आपल्या बाजूने मांडताना, संबंधित एमडी ड्रग छापेमारी व जप्तीची संपूर्ण कारवाई ही कायद्याने निर्धारित केलेल्या तरतुदींनुसार न झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अशा प्रकारे करण्यात आलेली छापामार कारवाई, जप्ती व आरोपींवरील अटक ही बेकायदेशीर असल्याचा मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून, मागील रविवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत, संबंधित अंमली पदार्थावरील छापा व अटक कारवाई ही कायदेशीर निकषांची पूर्तता न करणारी असल्याचे नमूद केले. परिणामी, सदर छापा व अटक बेकायदेशीर ठरवून दोन्ही आरोपींना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या निकालामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गांधीनगर पोलिस ठाण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कायद्याच्या चौकटीत राहून सखोल व कायदेशीर पद्धतीने तपास करणे किती आवश्यक आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा हा निर्णय असल्याचे कायदेविषयक वर्तुळात म्हटले जात आहे.
या प्रकरणात आरोपींच्या बाजूने प्रभावीपणे काम पाहणारे ॲड. अभिजीत पाटील व ॲड. दीपक पिंपळे यांची कायदेविषयक मांडणी आणि युक्तिवाद विशेष चर्चेत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच संबंधित आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचे नमूद केले जात आहे.

No comments: