अमरावतीतील ऑनलाइन फसवणूक प्रकरणात कोल्हापूरच्या तरुणाला अटक.
अमरावतीतील ऑनलाइन फसवणूक प्रकरणात कोल्हापूरच्या तरुणाला अटक.
----------------------------------------
फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र
अमरावती प्रतिनिधी :
पी. एन. देशमुख,
----------------------------------------
फसवणुकीतील ५ लाख रुपये कुलदीप सावरतकर यांच्या खात्यात जमा ; ११ लाख रुपये गोठवले
अमरावती शहर सायबर पोलिसांनी तब्बल ७० लाखांच्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणाचा मोठा पर्दाफाश करत कोल्हापूर येथील एका तरुणाला अटक केली आहे. शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ही मोठी फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात कोल्हापूरातील कुलदीप अशोक सावरतकर (वय ४०, रा. अहिल्याबाई होळकर नगर, फुलेवाडी रोड) याचा थेट सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात अमरावतीतील एका व्यक्तीची ७० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. या फसवणुकीतील ५ लाख रुपयांची रक्कम ‘काश्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ या कोल्हापूरस्थित कंपनीच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तपासात समोर आले. कंपनीचा मालक कुलदीप सावरतकर असून, जमा झालेली रक्कम त्याने पुढे विविध खात्यांमध्ये वर्ग केली असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या आधारे अमरावती पोलिसांचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आणि सावरतकर याला ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्यातील विविध बँक खात्यामधील ११ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.
अमरावती पोलिसांनी आवाहन केले आहे की,
“कुलदीप सावरतकर किंवा काश्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडून कोणी आर्थिक गुंतवणूक करून फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी तात्काळ तक्रार नोंदवावी.”
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी खात्री करूनच व्यवहार करावेत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
— फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र

No comments: