जयसिंगपूर–शिरोळ–कुरुंदवाडमध्ये घाणेरड्या हॉटेलांचा सुळसुळाट; फूड अधिकाऱ्यांचा ‘महिनेकरी’ धंदा?
जयसिंगपूर–शिरोळ–कुरुंदवाडमध्ये घाणेरड्या हॉटेलांचा सुळसुळाट; फूड अधिकाऱ्यांचा ‘महिनेकरी’ धंदा?
-------------------------------
जयसिंगपूर/शिरोळ
नामदेव भोसले
-------------------------------
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व परमिट रूम बारमध्ये स्वच्छतेचा कळस गाठला असताना, कागदावर स्वच्छतेचे धडे वाचणारे फूड सेफ्टी अधिकारी मात्र प्रत्यक्षात ‘महिनेकरी’ वसुलीच्या व्यवसायात गुंतल्याची नागरिकांतून तीव्र चर्चा आहे. ग्राहकांसाठी स्वच्छता गृहांची तुटवडा, हॅन्ड ग्लोज‑हेड कॅपशिवाय उघड्यावर बनणारे पदार्थ, दोन‑तीन दिवस डीप फ्रीजमध्ये खिचून ठेवलेले मटण‑चिकन‑अंडी व मसाले याचाच जेवण म्हणून ‘पुरवठा’ होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.स्वच्छतेऐवजी घाण – ग्राहकांचा जीव धोक्यातशहरातील अनेक हॉटेल‑रेस्टॉरंटमध्ये मूलभूत स्वच्छतागृहांची सोयच नाही; स्वयंपाकघर, वॉशिंग एरिया, कचरा साठवण या सर्व पातळ्यांवर घाण, दुर्गंधी आणि कीटकांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र दिसत आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांनुसार स्वच्छ टॉयलेट्स, हात धुण्याची सुविधा, स्वच्छ गणवेश, हॅन्ड ग्लोज व हेड कॅप अनिवार्य असतानाही प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांनी डोके उघडे, हात न धुता ग्राहकांसाठी पदार्थ बनवण्याचा ‘खेळ’ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तयार केलेले शिळे पदार्थ, उरलेले मटण, चिकन, अंडी तसेच मसाले दिवसन्दिवस डीप फ्रीजमध्ये घट्ट गोठवून ठेवले जात असल्याने त्या अन्नाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शीतसाखळीचे कडक निकष, ठराविक कालावधीनंतर अन्न निकामी मानण्याचे नियम आणि योग्य लेबलिंग‑डेटिंगची अट सर्रास पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप होत आहे.फील्डवर अधिकारी गायब, ‘फंटर’ मात्र हजरअशा परिस्थितीत फूड विभागाचे अधिकारी स्वतः हॉटेलमध्ये पायही न टाकता, स्वतःचे ‘फंटर’ पाठवून महिन्याची कलेक्शन करण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महिन्याला एकदा ‘पाकीट’ पोचत असताना, स्वच्छतेची पाहणी, नमुने घेणे, फूड क्वालिटी, टेस्टिंग पावडर, कृत्रिम कलर आणि प्रमाण तपासण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असा आरोप केला जात आहे.फूड सेफ्टी अधिकाऱ्यांवर अचानक तपासणी करणे, नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंड, नोटीस, परवाना निलंबन अशी कारवाई करण्याची जबाबदारी कायद्याने सोपवलेली असतानाही प्रत्यक्ष कारवाई शून्य असल्याचा नागरिकांचा सूर आहे. दिवाळी, सणासुदीच्या काळात मात्र संग्रहणासाठी अधिकारी स्वतः ‘दौरे’ वाढवतात, असा टोला हॉटेलमध्ये नियमित जाणाऱ्या ग्राहकांनी लगावला.“खातेनिहाय चौकशी करा, नाहीतर मोठा अपघात होईल”“एका बाजूला लाचखोरीत अडकणारे फूड अधिकारी बातम्यांत झळकतात आणि दुसऱ्या बाजूला आमच्या भागात अन्न तपासणी नावालाही नाही; उद्या एखादा फूड पॉइझनिंगचा मोठा प्रसंग घडला तर जबाबदार कोण?” असा सवाल नागरिaकांनी उपस्थित केला आहे.नागरिकांचे ठाम मत आहे की, संबंधित अधिकाऱ्यांची खाते‑निहाय चौकशी करून त्यांच्या तपासण्यांचा रेकॉर्ड, वसुलीचे आरोप नेटवर्क आणि परवानाधारक हॉटेलांचा वास्तविक तपासणी अहवाल सार्वजनिक करावा. “फुडचा अधिकारी आहे की ‘फंड’चा?” असा उपहासात्मक प्रश्न करून, स्वच्छता, फूड क्वालिटी तपासणी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तातडीने ठोस कारवाई करावे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

No comments: