आंबा घाटात भीषण अपघात; 115 नेपाळी कामगारांचा जीव थोडक्यात बचावला
आंबा घाटात भीषण अपघात; 115 नेपाळी कामगारांचा जीव थोडक्यात बचावला
-------------------------मलकापूर – प्रतिनिधी.
रोहित पास्टे
-------------------------
आंबा घाटातील कुप्रसिद्ध चक्री वळणावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातातून तब्बल 115 नेपाळी कामगारांचा जीव थोडक्यात बचावला. मध्य प्रदेश (MP 13 P 1371) क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स बस कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात असताना चालकाला झोप लागल्यामुळे गाडीवरील ताबा सुटून ती सुमारे 80 फूट दरीत कोसळली.
दरीतील दाट झाडीमुळे बस एका झाडाला आडवी तटली आणि मोठी दुर्घटना टळली. या अपघातात २४ प्रवासी जखमी असून त्यांना तातडीने साखरपा मार्गे रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटे घाट उतरताना चालकाच्या डोळ्यावर झोप येऊन गाडी दरीत कोसळली. बसमध्ये प्रवाशांना कोंबून नेण्यात आल्याची माहितीही पुढे येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस आणि आंबा परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. भाई पाटील, दिनेश कांबळे, दिग्वीजय गुरव, दीपक भोसले आणि तुषार पाटील यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात मोलाची मदत केली.
या अपघाताचा अधिक तपास साखरपा पोलीस करीत आहेत.

No comments: