कागलची राजकन्या आणि भारतीय क्रिकेटचा तारा; झहीर खान व सागरिका घाटगे-खानकडून कागल मधील राम मंदिर आणि गैबी दर्ग्याचे दर्शन.
कागलची राजकन्या आणि भारतीय क्रिकेटचा तारा; झहीर खान व सागरिका घाटगे-खानकडून कागल मधील राम मंदिर आणि गैबी दर्ग्याचे दर्शन.
-------------------------
प्रतिनिधी- सलीम शेख .
-------------------------
कागल : भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कागलच्या राजघराण्यातील सुकन्या सागरिका घाटगे-खान हिने आपले पती, भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्यासह आपल्या कागल या जन्मभूमीला भेट दिली. कागलच्या या लाडक्या लेकीने आणि जावयाने येथील ऐतिहासिक श्री राम मंदिर आणि प्रसिद्ध हजरत गैबी पीर दर्ग्याचे दर्शन घेऊन श्रद्धेचा जागर केला.कागल येथील शाहू महाराज घराण्यातील विजयसिंह घाटगे यांची कन्या असलेल्या सागरिकाचे बालपण याच नगरीत गेले आहे. 'चक दे! इंडिया' चित्रपटातील 'प्रीती सभरवाल' या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवलेल्या सागरिकाने केवळ अभिनयातच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील हॉकीमध्येही आपली चमक दाखवली आहे. हिंदी, मराठी आणि पंजाबी अशा विविध भाषांतील चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सागरिकाने भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू झहीर खानशी विवाह केला. झहीर खान हे कागलचे जावई असल्याने त्यांच्या या भेटीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
या दौऱ्यात सागरिका आणि झहीर यांनी श्री राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गैबी पीर दर्ग्यात जाऊन चादर अर्पण करत दर्शन घेतले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या मूळ गावी येत, इथल्या मातीतील संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करणाऱ्या या जोडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्रीला आणि भारतीय क्रिकेटच्या ताऱ्याला पाहण्यासाठी कागलकरांनी मोठी गर्दी केली होती.

No comments: