Header Ads

सांगली महापालिका क्षेत्रात ५० नवीन सामुदायिक शौचालये उभारणार; स्थायी समिती सभेत मंजुरी

 सांगली महापालिका क्षेत्रात ५० नवीन सामुदायिक शौचालये उभारणार; स्थायी समिती सभेत मंजुरी

-------------------------------------

 मिरज तालुका :-प्रतिनिधी राजु कदम.

,---------------------------------------


 **१ कोटी ६९ लाखांच्या निविदा प्रक्रियेला मान्यता; सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न**


 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध भागांत नवीन सामुदायिक शौचालये उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे **१ कोटी ६९ लाख ८ हजार ४०० रुपयांच्या** निविदा प्रक्रियेस स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

महानगरपालिका मुख्यालयातील कै. राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे सभागृहात **सभापती अतुल माने** यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा क्र. ०४ संपन्न झाली. या सभेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील व स्मृती पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


 **सभेतील मुख्य निर्णय:**


शासनाकडून प्राप्त निधी आणि महानगरपालिकेचा हिस्सा मिळून एकूण ५० सीट्सची (प्रति सीट १.७५ लाख शासन हिस्सा व १.६३ लाख मनपा हिस्सा) नवीन शौचालये उभारली जाणार आहेत. यासाठी ई-टेंडरद्वारे निविदा मागविण्यास आणि त्यावरील खर्चास समितीने कायदेशीर मान्यता दिली आहे.

 या कामासाठी शासनाचा ८७.५० लाख रुपये निधी आणि महानगरपालिकेचा ८१.५८ लाख रुपये निधी अशा एकूण निधीतून शहर स्वच्छतेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या जाणार आहेत.

 सभेच्या सुरुवातीला २ एप्रिल रोजी झालेल्या सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. 

या सभेस स्थायी समिती सदस्य पद्मश्री पाटील, मालुश्री खोत, मोहन वाटवे, गणेश माळी, उदय बेलवलकर, स्वाती शिंदे, कीर्ती देशमुख, बबीता मेंढे, स्मिता यमगर, दिपाली पाटील, मयूर पाटील, अभिजीत भोसले, शिरीन पिरजादे, मैनुद्दीन बागवान आणि सुरेश बंडगर उपस्थित होते.

सभेचे कामकाज महापालिका सचिव सहदेव कावडे यांनी पाहिले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी स्थायी समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी सभापती अतुल माने यांनी नमूद केले.

No comments:

Powered by Blogger.