घरफळा थकबाकीचे कारण देत विद्यार्थिनीला उतारा नाकारला; मनसेचा आंदोलनाचा इशारा.
घरफळा थकबाकीचे कारण देत विद्यार्थिनीला उतारा नाकारला; मनसेचा आंदोलनाचा इशारा.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
-----------------------------------
भुदरगड तालुक्यातील मुदाळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, घरफळा थकबाकीचे कारण देत एका विद्यार्थिनीला शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेला घराचा उतारा देण्यास नकार देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनीच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला असून संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर विद्यार्थिनीने ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही तिच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. शैक्षणिक कारणांसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाच्या नियमांनुसार शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे रोखून धरणे अन्यायकारक मानले जाते. मात्र, घरफळा थकबाकी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचा संबंध जोडून कागदपत्रे नाकारणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भुदरगड तालुका अध्यक्ष श्री. अशोक धोंडीराम पाटील यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित विद्यार्थिनीला तात्काळ घराचा उतारा उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेमुळे मुदाळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थिनीला न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.,

No comments: