शेतजमिनीला रस्ता नाही; कौलव शेतकऱ्यांचा १ मे रोजी उपोषणाचा इशारा .
शेतजमिनीला रस्ता नाही; कौलव शेतकऱ्यांचा १ मे रोजी उपोषणाचा इशारा.
-----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
------------------------------------
राधानगरी तालुक्यातील कौलव येथील शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त होत असून, प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. शेतकरी दत्तात्रय तुकाराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १ मे २०२६ रोजी राधानगरी तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे रीतसर अर्ज सादर केला होता. १७ मार्च २०२६ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष जागेची पाहणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही हालचाल झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असून, रस्ता नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भातील निवेदनाची प्रत राधानगरी पोलीस ठाण्यालाही देण्यात आल्याची माहिती शेतकरी दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे. आता प्रशासन या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments: