Header Ads

साताऱ्यातील बलात्कार प्रकरणात आरोपीला जन्मठेप; २० हजारांचा दंड.

 साताऱ्यातील बलात्कार प्रकरणात आरोपीला जन्मठेप; २० हजारांचा दंड.

-----------------

शेखर जाधव.

सातारा प्रतिनिधी.

------------------

सातारा, दि. ३१ (प्रतिनिधी) – जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा यांनी अत्यंत गंभीर अशा बलात्कार प्रकरणात आरोपी संकेत गुजर (वय २५) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून २०,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

दि. २१ मार्च २०२२ रोजी पहाटे सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपीने पारधी समाजातील २४ वर्षीय महिलेला आमिष दाखवून जबरदस्तीने मोटारसायकलवरून पळवून नेले. त्यानंतर खिंडवाडी परिसरातील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार केला. घटना घडल्यानंतर आरोपीने पीडितेला तेथेच सोडून पळ काढला.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल व पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

सदर खटला सानिका जोशी यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. या प्रकरणात एकूण २३ साक्षीदार तपासण्यात आले.

परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयांचे दाखले विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३७६ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व २०,००० रुपये दंड ठोठावला असून, त्यापैकी १५,००० रुपये पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास आरोपीस ३ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या खटल्यात पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरवी अधिकारी शीतल भोसले व तेजा तुपे यांनी कामकाज पाहिले.

No comments:

Powered by Blogger.