मांडव्यात लोकसहभागाची ताकद; अवघ्या आठ फुटांवर लागले पाणी, ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव!
मांडव्यात लोकसहभागाची ताकद; अवघ्या आठ फुटांवर लागले पाणी, ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव!
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सुरू झाले विहीर खोदकाम; झरे फुटू लागल्याने पाणीटंचाई मिटण्याची आशा.
---------------------------------------------सिद्धार्थ कदम | पुसद तालुका प्रतिनिधी.
-----------------------------------------------
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पुसद तालुक्यातील मांडवा गावात लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या विहीर खोदकामाला मोठे यश मिळाले असून अवघ्या आठ फुटांवरच पाणी लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावासाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.
लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या प्रयत्नातून यापूर्वी गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या चार विहिरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या सांडवा आणि बोरी (खु.) परिसरातील शेतशिवारातील विहिरींमधून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मे महिन्यात वाढत्या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
याच पार्श्वभूमीवर उपसरपंच विजय राठोड यांनी पुढाकार घेत स्वतःच्या दोन लाख तीस हजार रुपयांच्या खर्चातून विहीर खोदकाम सुरू केले. तसेच सरपंच तथा प्रशासक अल्का ढोले आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जागा मालक शेतकरी गोदाजी सुपले यांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वदिनी विहीर खोदकामास सुरुवात करण्यात आली आणि अवघ्या आठ फुटांवर पाणी लागल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या. खोदकाम जसजसे पुढे सुरू आहे, तसतसे विहिरीत झरे फुटत असल्याने गावाची पाणी समस्या कायमची मिटेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
गावकऱ्यांचा उत्साह आणि आनंद पाहून ग्रामविकास अधिकारी एस. टी. तडसे यांनी ग्रामस्थांना गोड भाताचा महाप्रसाद देत आनंद साजरा केला.
दरम्यान, या विहिरीच्या बांधकामासाठी तसेच पाईपलाईन योजनेसाठी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

No comments: