शिरोळ तहसीलचा मनमानी कारभार चव्हाट्यावर; आंदोलकाचा जीव धोक्यात, तरीही प्रशासनाचे पलायन!
शिरोळ तहसीलचा मनमानी कारभार चव्हाट्यावर; आंदोलकाचा जीव धोक्यात, तरीही प्रशासनाचे पलायन!
बहुजन पँथर सेनेच्या सौ. निशाताई बचुटे यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस; प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
शिरोळ (प्रतिनिधी): राजु कदम
शिरोळ तहसील कार्यालयात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून, बेकायदेशीररीत्या मौखिक तत्त्वावर सुरू असलेली 'उमेदवारी' आणि शासकीय दप्तरे खासगी व्यक्तींच्या हाती देण्याच्या मनमानी कारभाराविरोधात बहुजन पँथर सेनेने एल्गार पुकारला आहे. या भ्रष्ट आणि नियमबाह्य कारभाराविरोधात संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. निशाताई गणेश बचुटे यांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र, उपोषणकर्त्याची प्रकृती खालावूनही संवेदनहीन महसूल प्रशासन आंदोलनाची दखल घेण्याऐवजी पळवाटा शोधत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
प्रकृती खालावली; नायब तहसीलदारांचे पलायन
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी, काल दि. २०/११/२०२६ रोजी सायंकाळी सौ. निशाताई बचुटे यांची प्रकृती अचानक खालावली. तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून आणि शिरोळ पोलीस ठाण्याला रीतसर पूर्वसूचना (इंटिमेशन) देऊन त्यांना शिरोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकीकडे एका महिला आंदोलकाचा जीव टांगणीला लागलेला असताना, काल रात्री शिरोळच्या नायब तहसीलदार क्रांती पाटील यांनी आंदोलनाची साधी दखलही न घेता, तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या गेटमधून अक्षरशः पळ काढला. प्रशासनाच्या या असंवेदनशील आणि भ्याड भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बंदी आदेश असतानाही खासगी व्यक्तींच्या हाती शासकीय दप्तर
शासनाने खासगी उमेदवारीवर बंदी घालणारे स्पष्ट आदेश (परिपत्रक) काढलेले असतानाही, आज रोजी शिरोळ तहसील कार्यालयात खासगी उमेदवार बिनधास्तपणे शासकीय दप्तर हाताळताना रंगेहाथ आढळून आले आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे प्रशासनाने कायद्याला दिलेले उघड आव्हान आहे.
प्रशासनाची दिशाभूल आणि वरिष्ठांना चुकीची माहिती
या प्रकरणी संघटनेने माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सर्व पुराव्यांसह कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला कालच (दि. २०/११/२०२६) सविस्तर निवेदन सादर केले आहे. कंत्राटी भरती आदेशाचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या संजय जाधव यांची नियमबाह्य नियुक्ती तात्काळ रद्द करावी आणि बेकायदेशीर उमेदवारी थांबवावी, ही संघटनेची रास्त आणि कायदेशीर मागणी आहे. असे असतानाही, शिरोळ तहसील आणि प्रांत कार्यालयातील अधिकारी स्वतःचे पाप लपवण्यासाठी वरिष्ठांशी दूरध्वनीवरून बोलताना संघटनेची मागणीच बेकायदेशीर व चुकीची असल्याचे सांगत आहेत. इतकेच नव्हे, तर संबंधित उमेदवाराच्या पात्रतेवर बोट ठेवून प्रशासनाची नियमबाह्य निवड कशी योग्य आहे, याचा निर्लज्ज निर्वाळा देत आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत लढा थांबणार नाही : सौ. निशाताई बचुटे
दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असतानाही सौ. निशाताई बचुटे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, "शासकीय बंदी आदेशाचे उल्लंघन करून काम करणाऱ्या बेकायदेशीर उमेदवारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि संजय जाधव यांची नियमबाह्य कंत्राटी नियुक्ती रद्द झालीच पाहिजे. जोपर्यंत प्रशासन या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत बहुजन पँथर सेनेचा हा लढा तसूभरही मागे हटणार नाही."
प्रशासनाने आता तरी झोपेचे सोंग सोडून तात्काळ दोषींवर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी महसूल प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा बहुजन पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.


No comments: