नागठाणे फाट्यावर थरार! कमरेला पिस्टल लावून फिरणारा सराईत आरोपी एलसीबीच्या जाळ्यात.
नागठाणे फाट्यावर थरार! कमरेला पिस्टल लावून फिरणारा सराईत आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त; सांगली पोलिसांची धडक कारवाई.
---------------------------सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध पिस्टल बाळगणाऱ्या सराईत रेकॉर्डवरील आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे असून त्याचा साथीदार अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) हा सध्या फरार आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी अवैध शस्त्रधारकांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.
त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाला खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नागठाणे फाटा ते वाळवा रोडवरील चोपण रस्त्यावर एक इसम कमरेला पिस्टल लावून संशयास्पदरीत्या फिरत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि आरोपी अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी शस्त्राच्या परवान्याबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत हे पिस्टल अक्षय पाटील याच्याकडून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घेतल्याची कबुली आरोपीने दिली.
याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

No comments: