Header Ads

कौलवच्या शिवमुद्रा संघाची पिंपरी-चिंचवडमध्ये दणदणीत गर्जना; ‘महापौर चषक’वर कोरले सुवर्णाक्षरांनी नाव! साहिल पाटील ठरला ‘बुलेट’चा मानकरी; वैभव राबाडेला उत्कृष्ट पकडीसाठी ५० हजारांचे पारितोषिक

 कौलवच्या शिवमुद्रा संघाची पिंपरी-चिंचवडमध्ये दणदणीत गर्जना; ‘महापौर चषक’वर कोरले सुवर्णाक्षरांनी नाव!

साहिल पाटील ठरला ‘बुलेट’चा मानकरी; वैभव राबाडेला उत्कृष्ट पकडीसाठी ५० हजारांचे पारितोषिक.

--------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे.

---------------------------------------

राधानगरी तालुक्यातील कौलव गावच्या शिवमुद्रा क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आपल्या दमदार खेळाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘महापौर चषक’ कबड्डी स्पर्धेत शिवमुद्रा संघाने थरारक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाबद्दल संघाला तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानाचा चषक प्रदान करण्यात आला.


ग्रामीण मातीतून घडलेल्या या खेळाडूंनी आपल्या जिद्द, शिस्त आणि आक्रमक खेळाच्या जोरावर बलाढ्य संघांना धूळ चारत विजेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे कौलव गावासह संपूर्ण राधानगरी तालुक्याचा अभिमान उंचावला आहे.


स्पर्धेत शिवमुद्रा संघाचा स्टार खेळाडू साहिल पाटील याने आपल्या अष्टपैलू आणि झंझावाती खेळाने सर्वांची मने जिंकली. त्याच्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ हा बहुमान जाहीर करण्यात आला. या गौरवाबद्दल आयोजकांकडून त्याला थेट ‘बुलेट’ दुचाकी भेट देण्यात आली. त्यामुळे मैदानात साहिलच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा रंगली.

याचबरोबर संघाचा भक्कम बचावपटू वैभव रावाडे याने आपल्या अचूक आणि आक्रमक पकडींनी प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः हैराण केले. त्याच्या उत्कृष्ट बचाव कौशल्याची दखल घेत ‘उत्कृष्ट पकड’ पुरस्कारासह ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

शिवमुद्रा संघाच्या या यशामागे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक संग्राम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या कठोर सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि तांत्रिक नियोजनामुळे ग्रामीण भागातील खेळाडू आज राज्यस्तरावर आपला दबदबा निर्माण करत आहेत. शिवमुद्रा संघाने केवळ कबड्डीच्या मैदानावरच नव्हे, तर अनेक खेळाडूंना पोलीस भरती व सरकारी सेवेत संधी मिळवून देत तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

या दैदिप्यमान विजयानंतर कौलव परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवमुद्रा संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे राधानगरी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

No comments:

Powered by Blogger.