Header Ads

निमसाखरमध्ये श्री स्वामी समर्थ नामघोषाने दुमदुमले गाव; पौर्णिमा उत्सव उत्साहात

 निमसाखरमध्ये श्री स्वामी समर्थ नामघोषाने दुमदुमले गाव; पौर्णिमा उत्सव उत्साहात.

-----------------------------------
इंदापूर प्रतिनिधी : गणेश धनवडे.
------------------------------------

इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. "श्री स्वामी समर्थ" नामघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.

पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. पालखी मार्गावरील विविध चौकांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढून महिला भक्तांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेत सहभाग नोंदविला.

पालखी मंदिरात परतल्यानंतर ह.भ.प. श्री निवृत्ती उद्धव महाराज मरडे (पंढरपूर) यांचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी प्रवचन झाले. प्रवचनातून स्वामींच्या विचारांचा आणि भक्तीमार्गाचा संदेश उपस्थितांना मिळाला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व सामूहिक जप करण्यात आला.

यावेळी सर्व स्वामीभक्तांसाठी श्री संतोष पांडुरंग माने (घोरपडवाडी) यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पालखीची आकर्षक सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली होती. वालचंदनगर येथील स्वामीभक्त श्री राम कुंभार यांनी दत्त मंदिर परिसरात मनमोहक रांगोळी साकारून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

या धार्मिक सोहळ्यास निमसाखर गावातील तसेच परिसरातील स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा संगम घडविणारा हा पौर्णिमा उत्सव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

No comments:

Powered by Blogger.