मुरगूडात ८ मे रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’; नागरिकांनी लाभ घ्यावा – तहसील प्रशासनाचे आवाहन
मुरगूडात ८ मे रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’; नागरिकांनी लाभ घ्यावा – तहसील प्रशासनाचे आवाहन.
--------------------------------मुरगूड / जोतीराम कुंभार :.
--------------------------------
मुरगूड येथे गुरुवार, दि. ८ मे रोजी सकाळी ९.३० वाजता ‘महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तहसील कार्यालय, कागल यांच्या वतीने चिमगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे हे शिबिर पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.
राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) राबविण्यात येत असून त्याअंतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध महसूल व शासकीय कामांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतर, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज व मंजुरी, तुकडेबंदी सुधारणा अंतर्गत नोंदी मंजुरी, तसेच वय, राष्ट्रीयत्व, डोमिसाइल, उत्पन्न, रहिवास, जात आदी विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय फेरफार नोंदींचा निपटारा, अभिलेख दुरुस्ती, नवीन महसूल सुधारणा याबाबत मार्गदर्शन व हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
पुरवठा विभागाकडून संगणकीकृत शिधापत्रिकांचे वाटप, आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिर, कृषी विभागामार्फत शेती अवजारे वाटप, पीएम किसान व ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच बी-बियाण्यांबाबत माहिती दिली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून प्रधानमंत्री मातृवंदना, लेक लाडकी, बेटी बचाओ बेटी पढाओ, घरपोच आहार व बाल आधार योजनांची माहिती व लाभ देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत विभागाकडील विविध योजना, आधार अद्ययावत सेवा तसेच बचत गटांशी संबंधित सेवा देखील शिबिरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, कागल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: