संभाजी महाराज जयंतीआधी पोलिसांचा धडाका! मध्यरात्री डीजे ट्रायल महागात; हिंदवी ग्रुपच्या ७ जणांवर गुन्हा
संभाजी महाराज जयंतीआधी पोलिसांचा धडाका! मध्यरात्री डीजे ट्रायल महागात; हिंदवी ग्रुपच्या ७ जणांवर गुन्हा.
------------------------कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली असून, मध्यरात्री डीजेची ट्रायल घेणाऱ्या विचारेमाळ येथील ‘हिंदवी ग्रुप’च्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या स्पष्ट सूचना आणि लेखी नोटीस धुडकावून हा प्रकार केल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
१४ मे रोजी होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध मंडळांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळले जावेत यासाठी शाहूपुरी पोलिसांनी आगाऊ बैठक घेऊन मंडळांना मध्यरात्री डीजे ट्रायल न घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. याबाबत लेखी नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.
मात्र, बुधवार (दि. १३ मे) रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत विचारेमाळ परिसरात हिंदवी ग्रुपच्या वतीने ध्वनीक्षेपक यंत्रणेची ट्रायल घेण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अभिषेक किशोर दाभाडे, प्रेम कैलास सुर्यवंशी, स्वराज महादेव खोंद्रे, करण राजू मोरे, श्रेयस अशोक कलढोणे, प्रणव रमेश मुळीक आणि अदित्य मिलीद येडगे यांचा समावेश आहे.
या सर्वांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २२३, १२६, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“जयंती उत्सवाच्या काळात शांतता भंग करणारे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा शाहूपुरी पोलिसांनी दिला आहे.

No comments: