पोंबरे येथे राखणीजवळील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला
पोंबरे येथे राखणीजवळील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला
पंधरा ते वीस कुत्र्यांचा पडशा पडला.....
-----------------------------पन्हाळा - माधुरी मस्कर.
-----------------------------
पन्हाळा तालुक्यातील पोंबरे परिसरात गव्याच्या वाढत्या वावरानंतर आता बिबट्याचाही संचार वाढल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री आजाबाई देवाजवळील शेत परिसरात राखणीसाठी बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरफटत नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही परिसरातील पंधरा वीस कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत.
ही घटना बाजीराव काटकर व शहाजी गौळकर यांच्या शेत परिसरात घडली. रात्रीच्या वेळी अचानक कुत्र्याच्या जोरदार ओरडण्याचा आवाज आल्याने शेतकरी बाहेर आले असता बिबट्या कुत्र्याला ओढत नेत असल्याचे दिसून आले. मात्र अंधार आणि भीतीमुळे नागरिकांनी जवळ जाण्याचे धाडस केले नाही. पोंबरे परिसर डोंगरकडेला असल्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर सातत्याने वाढत आहे. दररोज गवे दिसतात. आता बिबट्याच्या हालचाली वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे, राखण करणे तसेच जनावरे सांभाळणे धोकादायक बनले आहे. वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

No comments: