गेल्या १५ दिवसात दूध संकलन ३५ हजार लिटरने घटले.
गेल्या १५ दिवसात दूध संकलन ३५ हजार लिटरने घटले
वाढत्या उष्णतेचा दुधाच्या उत्पादनाला फटका...
म्हशीच्या दुधातील घट चिंताजनक : गायीच्या दुधात वाढ....
-----------------------------`
पन्हाळा-माधुरी मस्कर.
----------------------------
कोल्हापुरात सध्या तापमानाने टोक गाठले आहे, मग ते वातावरणातील असो की गोकुळच्या घडामोडीचे. यात कार्यकर्ते आणि दूध उत्पादक होरपळून निघत आहेत. एकीकडे गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटली असताना दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे दूधही आटू लागले आहे. गोकुळ दूध संघात गेल्या १५ दिवसांत तब्बल ३५ हजार लिटरनी दूध संकलनात घट झाली आहे. यात म्हशींच्या दुधातील घट चिंताजनक आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आणि बाहेर देखील गोकुळचीच चर्चा आहे. निवडणूक प्रक्रिया, प्रशासक
गतवर्षीच्या तुलनेत वाढ
नियुक्ती, न्यायालयातील सुनावण्या, भ्रष्टाचाराचे आरोप, नेत्यांमधील कलगीतुरा आदी कारणांमुळे गेली १५ दिवस गोकुळ खूपच गाजत आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय तापमान कमालीचे वाढले आहे. ही स्थिती एका बाजूला असतानाच दुसरीकडे गोठ्यातील जनावरेही वाढत्या उष्म्याने अक्षरशः हैराण झाली आहेत. त्याचा परिणाम थेट दुधाच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे.
म्हशीच्या दुधात घट; गाईच्या दुधात वाढ....
म्हशींना घामाच्या ग्रंथी नसतात. त्यामुळे त्या उष्म तापमानाला लवकर बळी पडतात. परिणामी दुधातही घट होते. गेल्या १५ दिवसांत म्हशीच्या दुधात ४० हजार लिटरची घट झाली आहे,
उलट गाईचे दूध उत्पादन मात्र १२ हजार लिटरनी वाढल्याचे दिसत आहे. याला गाईच्या गर्भधारणेचे केलेले नियोजन कारणीभूत आहे. उन्हाळ्यात गाईच्या दुधाला संघाकडून जास्त दर दिला जातो. याचा लाभ घेण्यासाठी म्हणून गाई एप्रिल-मे महिन्यात वेतील असे नियोजन केले जात आहे.
पशुखाद्यामुळे मेटाकुटीला...
जिल्हा पाणीदार असला तरी मशागतीच्या कामासाठी शिवारे रिकामी झाल्याने जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. मका, शाळूही आता कमी होत असल्याने हत्ती गवत आणि उसाच्या पाल्याचा वापर वाढला आहे. यात दुध निर्मितीसाठीचे आवश्यक प्रोटीन नसल्यामुळे दूध उत्पादन घटू लागले आहे. यात भरीस भर म्हणजे पशुखाद्याचे दर पोत्यामागे किमान ५० ते १०० रुपयांनी वाढल्याने पशुखाद्यावरील खर्चात वाढ झाली आहे.
चौकट-
गतवर्षीच्या तुलनेत वाढ...
१५ दिवसांपूर्वी म्हणजे २९ एप्रिल रोजी १६ लाख १० हजार दुधाचे संकलन दररोज होत होते. आता १२ मे अखेरच्या आकडेवारीनुसार १५ लाख ८२ हजार लिटरपर्यंत संकलन खाली आहे. म्हणजेच ३५ हजार लिटर दूध कमी झाले आहे. यात समाधानाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दूध पाहिले तर ३० हजार लिटरची वाढ दिसत आहे. गेल्या वर्षी १५ ते २५ लाख लिटर संकलन होते ते आता १५ लाख ५५ हजार लिटर पोहचले आहे.

No comments: