पुणे ग्रामीणमध्ये अपघात रोखण्यासाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार *१५ ते २० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट, प्रमुख ठिकाणी जनजागृतीपर सूचनाफलक लावणार
पुणे ग्रामीणमध्ये अपघात रोखण्यासाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार
*१५ ते २० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट,
*प्रमुख ठिकाणी जनजागृतीपर सूचनाफलक लावणार.
--------------------------------पुणे प्रतिनिधी- कैलास बोडके .
---------------------------------
पुणे ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली असून, अपघातांचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाभर महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीपर सूचनाफलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशनने जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे.
ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातप्रवण क्षेत्रे, तीव्र वळणे, घाटरस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच महामार्गांवरील धोकादायक ठिकाणी हे सूचनाफलक लावण्यात येणार आहेत. या फलकांद्वारे वाहनचालकांना सुरक्षित वाहनचालना करण्याबाबत सतत जागरूक केले जाणार आहे.
सूचनाफलकांवर “वेगावर नियंत्रण ठेवा, जीव वाचवा”, “हेल्मेट तुमचे सुरक्षा कवच आहे”, “सीटबेल्ट लावा, सुरक्षित राहा”, “मद्यपान करून वाहन चालवू नका” तसेच “मोबाईलवर बोलत वाहन चालवणे टाळा” असे संदेश झळकणार आहेत.
याबाबत बोलताना पोलीस प्रशासनाने सांगितले की, केवळ दंडात्मक कारवाई करून अपघात रोखणे शक्य नाही. वाहनचालकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे तितकेच आवश्यक असून, हे सूचनाफलक सुरक्षिततेची सातत्याने जाणीव करून देतील.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढून अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या वेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमने, पोलीस हवलदार नामदेव बांबळे, किशोर बर्डे, धनंजय पालवे आदी उपस्थित होते

No comments: