मुक्ताई माता मंदिरातील चोरीचा उलगडा; परजिल्ह्यातील टोळी गजाआड, ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
मुक्ताई माता मंदिरातील चोरीचा उलगडा; परजिल्ह्यातील टोळी गजाआड, ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त.
जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्ताई माता मंदिरातील चोरीप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत परजिल्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून साऊंड सिस्टम, एलईडी टीव्ही, देवीचे मंगळसूत्र आणि टेंपो असा तब्बल ३ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतवाडी (ता. जुन्नर) येथील विजय शरद फापाळे यांच्या मालकीचा टाटा 709 टेंपो तसेच दोन एम्प्लिफायर मशीन १८ एप्रिलच्या रात्री चोरीला गेले होते. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिरातील चोरीमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या गुन्ह्याचा तपास करताना आळेफाटा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. अखेर युवराज पोपट कातोरे (वय २८), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ (वय २०) आणि अजय किसन मेंगाळ (वय २५, सर्व रा. जाबूत बु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत आरोपींनी मुक्ताई माता मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून एम्प्लिफायर मशीन, मिक्सर, एलईडी टीव्ही, देवीचे मंगळसूत्र आणि चोरीस गेलेला टेंपो असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या पथकाने केली.
मंदिरातील चोरीचा उलगडा करत आरोपींना जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी आळेफाटा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

No comments: