17 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त; मध्यरात्रीच्या धाडीत तिघांवर गुन्हा.
17 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त; मध्यरात्रीच्या धाडीत तिघांवर गुन्हा.
--------------------------------------------सातारा : सातारा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल 17 लाख 9 हजार 900 रुपयांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा, दोन बोलेरो आणि टाटा टेम्पो जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियमासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे मायणी-विटा मार्गावरील गरवारे वस्ती येथे मध्यरात्री छापा टाकण्यात आला. दोन बोलेरो वाहनांमध्ये "Super Power 90 NX – Danger Explosive" असे नमूद असलेल्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या व इतर स्फोटके आढळून आली.
बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDS) आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने स्फोटकांची खात्री दिल्यानंतर अत्यंत सावधगिरीने संपूर्ण साठा जप्त करून परिसर सुरक्षित करण्यात आला.
जप्त मुद्देमाल
1,800 जिलेटिन कांड्या (9 बॉक्स)
इलेक्ट्रिक, नॉन-इलेक्ट्रिक व ऑर्डिनरी डेटोनेटर्स
सेफ्टी फ्युज
दोन बोलेरो वाहने
टाटा कंपनीचा बंद टेम्पो
एकूण किंमत : ₹17,09,900
या प्रकरणी विशाल लक्ष्मण जाट (39), बारुलाल लक्ष्मण जाट आणि शंकर बेनीराम चौधरी यांच्याविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियम 1884 चे कलम 9(ब), स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 5 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 288 अन्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या उल्लेखनीय कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अजित कर्णे, प्रवीण पवार, स्वप्निल दौंड, अमित सपकाळ तसेच वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments: