रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ...
----------------------------------इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयाची कुस्तीपटू पैलवान अनुष्का हास्पे (यादव) हिची दि. १० जुलै २०२६ रोजी हरियाणातील रोहतक येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ५३ किलो वजन गटात महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे संस्था, महाविद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
हिंदकेसरी स्पर्धेतील रौप्यपदकापासून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतचा अनुष्काचा प्रवास हा कठोर परिश्रम, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता तिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राज्य संघात स्थान मिळवले आहे.
अनुष्काने यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. तसेच यावर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्यपदक पटकावत तिने आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव विरसिंह रणसिंग,खजिनदार वीरबाला पाटील,विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त राही रणसिंग,विश्वस्त शंकर रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट यांनी तिचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील एका जिद्दी खेळाडूने मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतल्याने अनुष्का हास्पे आज अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची नवी उमेद मिळाली आहे.

No comments: