Header Ads

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी; क्षीरसागरांच्या राजीनाम्याची मागणी.

 राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी; क्षीरसागरांच्या राजीनाम्याची मागणी.

-----------------------------
कोल्हापूर | प्रतिनिधी
शशिकांत कुभार.
----------------------------

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र दौऱ्याचा प्रारंभ कोल्हापूरातून होणार असून, त्याआधी जिल्ह्यातील पक्ष संघटना पुनर्बांधणीचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती मनसेचे संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यशवंत किल्लेदार यांनी सांगितले की, संपर्क अध्यक्ष म्हणून नियुक्तीनंतर गेल्या दोन महिन्यांत त्यांनी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, नव्या इच्छुक कार्यकर्ते, महिला व युवती यांच्याशी थेट संवाद साधला आहे. पक्षवाढीसाठी सर्वांची मते जाणून घेतली असून, योग्य व्यक्तींना संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत, कथित ४० लाख रुपयांच्या टक्केवारी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तातडीने अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच, १०० कोटी रुपयांच्या निधीतून झालेल्या रस्ते विकासकामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत टक्केवारीमुळे विकासकामांचा दर्जा घसरल्याचा आरोप केला.

शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीच्या घटनांवरही मनसेने टीका केली. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, जबाबदारांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

संपर्क अध्यक्ष नंदकुमार चिले यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान ते पक्ष पदाधिकारी तसेच समाजातील विविध मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. रंकाळा संवर्धन, पंचगंगा नदीचे प्रदूषण, कोल्हापूर हद्दवाढ, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, आयटी पार्क, शेतकरी प्रश्न, दूध दरवाढ, शक्तीपीठ महामार्ग, खतांच्या वाढलेल्या किमती आदी स्थानिक प्रश्नांचा सविस्तर अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.