लग्नाच्या 20 दिवस आधी काळाचा घाला! 17 कोटींच्या शाही लग्नाचे स्वप्न क्षणात उद्ध्वस्त;
लग्नाच्या 20 दिवस आधी काळाचा घाला! 17 कोटींच्या शाही लग्नाचे स्वप्न क्षणात उद्ध्वस्त; ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू.
महाबळेश्वर/सातारा प्रतिनिधी :
अवघ्या वीस दिवसांवर आलेले शाही लग्न, जयपूरमधील महाल बुक, पाहुण्यांसाठी दोन विमाने तयार, होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसासाठी सरप्राइजची आखणी... पण नियतीने एका क्षणात सर्व आनंद हिरावून घेतला. ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (वय 24) याचे पुढील महिन्यात लग्न होणार होते. या विवाहासाठी जयपूरमधील आलिशान महाल निश्चित करण्यात आला होता. लग्नसोहळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची तयारी सुरू होती. दागिने, कपडे, पाहुण्यांची व्यवस्था आणि राजेशाही थाटासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
दरम्यान, 19 जून रोजी होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतनने खास सरप्राइजची तयारी केली होती. त्यानिमित्त तो मित्र आणि होणाऱ्या पत्नीसह ट्रेकिंगसाठी लोहगड परिसरात गेला होता. यावेळी दरीच्या काठावर फोटो काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो सुमारे 350 मीटर खोल दरीत कोसळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ट्रेकर्स व बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली. घनदाट जंगलातून मोठ्या प्रयत्नांनी केतनला वर आणण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विवाहसोहळ्याची स्वप्ने एका क्षणात भंगली. आनंदाच्या तयारीत असलेल्या अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
"राजेशाही लग्नाची तयारी सुरू असतानाच नियतीचा घाला; वाढदिवसाच्या सरप्राइजपूर्वीच तरुणाचा दुर्दैवी अंत" अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

No comments: