Header Ads

निसर्गाचा कहर! जुलपेवाडी धरणाजवळ वीज कोसळून नरतवडेच्या युवकाचा जागीच मृत्यू पर्यटनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला; दोन युवक गंभीर जखमी

 निसर्गाचा कहर! जुलपेवाडी धरणाजवळ वीज कोसळून नरतवडेच्या युवकाचा जागीच मृत्यू,पर्यटनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला; दोन युवक गंभीर जखमी.



----------------------------

राधानगरी प्रतिनिधी : 

विजय बकरे.

-----------------

भुदरगड तालुक्यातील जुलपेवाडी धरण परिसरात निसर्गाने अक्षरशः कहर केला. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या युवकांवर अचानक काळाने झडप घातली आणि विजेच्या भीषण तडाख्यात राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील दोन आणि आजरा तालुक्यातील दोन युवक जुलपेवाडी धरण परिसरात पर्यटनासाठी गेले होते. धरण परिसरात फिरणे, मासेमारी करणे आणि त्यानंतर आरळगुंडी परिसरात चिकन पार्टीचा बेत आखण्यात आला होता. युवक जेवणाची तयारी करत असतानाच वातावरणात अचानक बदल झाला. काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच कडकडाटासह वीज कोसळली.

या विजेच्या तडाख्यात अजित दत्तात्रय चौगले (रा. नरतवडे, ता. राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सोबत असलेले दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नरतवडे गावावर शोककळा पसरली आहे. अजित चौगले यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, या घटनेची अधिकृत नोंद संबंधित पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत झालेली नव्हती.

पर्यटनासाठी गेलेल्या युवकांचा आनंदाचा क्षण काही क्षणांतच दुःखद दुर्घटनेत बदलला आणि एका कुटुंबाचा आधारवड हिरावून गेला.

No comments:

Powered by Blogger.