Header Ads

जनतेचा पगार अडवून लाचखोरीचा खेळ; ACBच्या कारवाईने प्रशासनात खळबळ!

जनतेचा पगार अडवून लाचखोरीचा खेळ; ACBच्या कारवाईने प्रशासनात खळबळ!

------------------------------
कोल्हापूर | प्रतिनिधी.
शशिकांत कुभार.
-----------------------------

-------------------------

"काम करायचं असेल तर पैसे द्यावेच लागतील..." असा जणू अलिखित नियमच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बनवला आहे. मात्र, एका शिक्षकाचा थकीत पगार आणि पगारातील फरक मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकाऱ्याचा हा डाव अॅन्टी करप्शन ब्युरोने उधळून लावला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी दगडू चंद्राप्पा कुंभार यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBने रंगेहात पकडल्याने महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या एका शिक्षकाचा थकीत पगार व पगारातील फरक मंजूर करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तब्बल ४० हजार रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे, नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी यापूर्वीच १० हजार रुपये घेतल्याचेही पडताळणीत उघड झाले आहे.

शिक्षकाने हार न मानता थेट अॅन्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली. तक्रारीनंतर ACBने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आखलेल्या सापळ्यात आरोपी अधिकाऱ्याने २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच ACBच्या पथकाने त्याला रंगेहात जेरबंद केले.

या कारवाईमुळे शिक्षण विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "सामान्य कर्मचाऱ्यांचा हक्काचा पगार मिळवण्यासाठीही लाच द्यावी लागते का?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. ACBच्या धडक कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

No comments:

Powered by Blogger.