Header Ads

शाहूवाडी तालुक्यात चिमुकल्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत

 शाहूवाडी तालुक्यात चिमुकल्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत.......

----------------------------------------
मलकापूर (प्रतिनिधी): रोहित पास्ते.
----------------------------------------- 

उन्हाळी सुट्टीनंतर आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये छोट्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा चैतन्य पाहायला मिळाले. उन्हाळी सुट्टी संपल्यामुळे शाळांमध्ये पुन्हा एकदा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने नवे चैतन्य निर्माण झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण वाड्या-वस्तीवरील विद्यार्थी आज नटून-तटून शाळेच्या प्रवेशासाठी सज्ज झाले होते. प्ले स्कूल, नर्सरी, केजी, बालवाडी आणि पहिलीच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणी तर सजवलेल्या रथातून या लहान विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अत्यंत संस्मरणीय ठरला.

शाळेत सोडायला आलेल्या पालकांना "आमच्या सोबत तुम्ही पण शाळेत या," असा हट्ट धरून काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले, तर काही विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या प्रेमळ सादेला चांगलाच प्रतिसाद दिला. पाठीवर नवे कोरे दप्तर, अंगावर नवीन गणवेश, पालकांची उत्सुकता आणि विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यांमुळे संपूर्ण शाळांचे वातावरण आनंदी झाले होते. कोळगाव येथील विद्या मंदिर शाळेमध्ये शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार हे नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट, पुष्पगुच्छ आणि रंगीबेरंगी फुगे देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळांच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या, रंगीबेरंगी फुगे आणि स्वागताचे सुंदर फलक लावण्यात आले होते. चॉकलेट, भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन या चिमुकल्यांचे आगळेवेगळे स्वागत झाले आणि पहिल्या दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. काही मुलांनी आपल्या पालकांना घट्ट मिठी मारली होती, तर काहीजण पालकांना बाय-बाय करत वर्गात जात होते. रडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर शिक्षकांनी मायेचा हात ठेवून त्यांना धीर दिला. अशा अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरणात आज पहिलाच शैक्षणिक दिवस या नव्या उपक्रमाने गाजला.

यावेळी विद्या मंदिर कोळगाव येथे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, मुख्याध्यापक अमोल साळवे, लोकनियुक्त सरपंच मंगला पाटील, सोनाली पाटील, शिक्षक कर्मचारी विक्रम पाटील आणि श्रीकांत पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

No comments:

Powered by Blogger.