Header Ads

लालपरीचा डिजिटल प्रवास सुरू! विद्यार्थ्यांच्या हातात आता ‘स्मार्ट’ कार्ड; कागदी पासला रामराम.

 लालपरीचा डिजिटल प्रवास सुरू! विद्यार्थ्यांच्या हातात आता ‘स्मार्ट’ कार्ड; कागदी पासला रामराम......

कोल्हापूर | प्रतिनिधी विजय बकरे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी मोठा आणि आधुनिक निर्णय घेतला आहे. यापुढे पारंपरिक कागदी बस पास इतिहासजमा होणार असून, विद्यार्थ्यांना सवलतीच्या प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या ‘सरल’ आयडीशी जोडले जाणारे हे स्मार्ट कार्ड केवळ एसटी बसपुरते मर्यादित नसून, देशभरातील मेट्रो, लोकल रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही वापरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच कार्डातून बहुउपयोगी प्रवास सुविधा मिळणार आहे.

गर्दीला ब्रेक; शाळेतच होणार नोंदणी

दरवर्षी बस पाससाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि गर्दी टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. अधिकृत एजंट थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

काय आहे NCMC स्मार्ट कार्ड?

NCMC हे प्रीपेड डिजिटल स्मार्ट कार्ड असून, विद्यार्थ्यांना एसटीच्या सवलतीच्या प्रवासाचा लाभ या कार्डाद्वारे मिळणार आहे. याशिवाय मेट्रो, बेस्ट बस, काही रेल्वे सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्येही या कार्डाचा वापर करता येणार आहे.

कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

▶ ‘सरल’ किंवा ‘अपार’ क्रमांक आवश्यक

▶ संबंधित क्रमांक आधारशी जोडलेला असणे बंधनकारक

▶ शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र

▶ विद्यार्थी किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक

▶ अर्ज एसटीच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध

▶ नोंदणीनंतर सुमारे ३० दिवसांत कार्ड उपलब्ध

▶ पीओएस मशीनद्वारे कार्ड सक्रिय केले जाणार

सवलतींचा गैरवापर होणार बंद

NCMC कार्ड विद्यार्थ्यांच्या ‘सरल’ आयडीशी जोडले जाणार असल्याने लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल. त्यामुळे सवलतींचा गैरवापर रोखण्यास मदत होणार असून संपूर्ण व्यवस्था अधिक पारदर्शक बनणार आहे.

कार्ड मिळवण्याची प्रक्रिया

विद्यार्थ्यांनी प्रथम शाळा किंवा महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र घ्यावे. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.

शुल्क किती?

NCMC स्मार्ट कार्डसाठी विद्यार्थ्यांना १९९ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे कार्ड प्रीपेड स्वरूपाचे असल्याने भविष्यात इतर वाहतूक सेवांसाठीही त्याचा उपयोग करता येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी आधुनिकतेकडे मोठे पाऊल

एसटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना तातडीने नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक लाभवाटप, सुरक्षित व्यवहार आणि एकाच कार्डातून विविध वाहतूक सेवांचा लाभ या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासात मोठा बदल घडणार आहे.

No comments:

Powered by Blogger.