योजनांतील त्रुटींवर अधिकाऱ्यांना खडसावले; लाभार्थी वंचित राहणार नाहीत” जि.प. अध्यक्ष शिल्पा खोत यांचा राधानगरीत प्रशासनाला सज्जड इशारा
“योजनांतील त्रुटींवर अधिकाऱ्यांना खडसावले; लाभार्थी वंचित राहणार नाहीत”जि.प. अध्यक्ष शिल्पा खोत यांचा राधानगरीत प्रशासनाला सज्जड इशारा.
----------------------------------------शासनाच्या सर्व योजना पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवून कोणताही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच योजनांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
‘एक पाऊल प्रगतीकडे... अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे’ या उपक्रमांतर्गत राधानगरी पंचायत समिती सभागृहात आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीदरम्यान विविध विकासकामांतील त्रुटी आणि विलंबाबाबत बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घरकुल योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रमाई आवास योजना बंद झाल्यामुळे मागासवर्गीय लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा गटनेते अरुण जाधव यांनी उपस्थित केला. या नागरिकांचा पंतप्रधान आवास योजनेत समावेश करून त्यांना लाभ देण्याची मागणी त्यांनी केली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी शिक्षक समायोजन, शाळा बांधकाम आणि दुरुस्तीबाबतचा अहवाल सादर केला. यावेळी पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त शाळांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात संस्थात्मक प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण, आभा कार्ड आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला. अनेक आरोग्य उपकेंद्रांमध्ये इंजेक्शन व सलाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी उपचारांचा आधार घ्यावा लागत असल्याची बाब समोर आली. यावर संबंधित उपकेंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
याशिवाय बांधकाम, एकात्मिक बाल विकास, ग्रामपंचायत, कृषी, पशुसंवर्धन आणि स्वच्छ भारत अभियान आदी विभागांच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश देण्यात आले. पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील यांनी राधानगरी तालुक्यात शासन व जिल्हा परिषदांच्या विविध योजना शंभर टक्के प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे सांगितले.
बैठकीस उपाध्यक्ष तानाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, शिक्षण सभापती शीतल यादव, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, बालकल्याण सभापती विद्या पाटील, जि.प. सदस्य अभिजीत तायशेटे, संयोगिता मोरे, सागर धुंधरे, अमृता डोंगळे, उपसभापती अश्विनी चौगले तसेच सर्व विभागांचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते. आभार गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी यांनी मानले.

No comments: