Header Ads

मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ५७ हजारांचा गांजा जप्त, एक जेरबंद

 मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ५७ हजारांचा गांजा जप्त, एक जेरबंद

------------------------------------
 सांगली मिरज प्रतिनिधी.
राजू कदम.
-----------------------------------

मिरज, प्रतिनिधी : अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २ किलो ३०५ ग्रॅम गांजा जप्त केला असून एका संशयितास अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ₹५७,६२५ इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव सिताराम शिंदे (वय ४०, रा. बेवनूर, ता. जत, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९३/२०२६ अन्वये एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(२)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.

दि. ६ जून रोजी सुभाषनगर परिसरात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गांजा घेऊन संशयास्पदरीत्या थांबला आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये निळ्या प्लास्टिक पिशवीत हिरवट-काळपट रंगाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, पोउपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, रावसाहेब सुतार, अमोल ढोले, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, राहुल देशमुख, दिपाली केंद्रे, रामचंद्र शिंदे आणि स्वप्नील भोसले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा 'वॉर' सुरूच

मिरज ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.