मित्राच्या विश्वासघाताचा धक्कादायक शेवट; २४ तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
मित्राच्या विश्वासघाताचा धक्कादायक शेवट; २४ तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या! बहिरेश्वर गावातील घरफोडीचा करवीर पोलिसांकडून झपाट्याने उलगडा; दीड लाखांच्या दागिन्यांसह आरोपी जेरबंद.
------------------------करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावात घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा करवीर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीचा जवळचा मित्रच चोरीमागील सूत्रधार निघाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शिव माळवाडी, बहिरेश्वर येथील संभाजी शिवाजी काशीद हे आपल्या कुटुंबासह भात पेरणीसाठी शेतात गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. घरातील विश्वासाची जागा ओळखून चोरी करण्यात आल्याने संशयाची सुई जवळच्या व्यक्तीकडे वळली होती.
घटना उघडकीस आल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी गावात गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, फिर्यादीचा मित्र वैभव विश्वास पडवळे (वय २९, रा. बहिरेश्वर) यानेच चोरी केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी खुपिरे फाटा परिसरात सापळा रचला. आरोपी दागिने विक्रीसाठी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून सोन्याचे व चांदीचे दागिने असा तब्बल १ लाख ४४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कसून चौकशी केल्यानंतर वैभव पडवळे याने चोरीची कबुली दिली. मित्राच्या घरावरच डल्ला मारून विश्वासाला तडा देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गजाआड केले.
या यशस्वी कारवाईमुळे करवीर पोलिसांच्या तत्परतेचे आणि तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

No comments: