बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त
बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त.
--------------------------------सांगली मिरज प्रतिनिधी.
राजू कदम.
-----------------------------------
बनावट नंबरप्लेट लावून शासनाची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल ₹१०,००,०१० किमतीचा आयशर टेम्पो आणि बनावट नंबरप्लेट जप्त करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी भारतनगर, १०० फूटी रोड परिसरात गस्तीदरम्यान संशयास्पद आयशर टेम्पो आढळला. वाहनावरील नंबरप्लेटमध्ये खाडाखोड झाल्याचा संशय आल्याने पोलीसांनी पाठलाग करून वाहन थांबवले. चालकाकडे कागदपत्रांची चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.
ई-चालान प्रणालीद्वारे वाहनाची पडताळणी केली असता इंजिन आणि चेसिस क्रमांकामध्ये तफावत आढळली. अधिक चौकशीत वाहनावर दुसऱ्या आयशर वाहनाचा एमएच-१०-ईजे-७८६६ हा बनावट नोंदणी क्रमांक वापरण्यात आल्याचे उघड झाले. वाहनाचे विमा, पीयूसी, फिटनेस प्रमाणपत्र आणि रोड टॅक्सची जबाबदारी टाळण्यासाठी हा बनावट नंबर वापरून शासनाची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी आयुब शमशुद्दीन गोलंदाज आणि फिरोज आयुब गोलंदाज (रा. भारतनगर, मिरज) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, हेडकॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

No comments: