धगधगत्या आगीत क्षणात होत्याचं नव्हतं! मिरजेत घर जळून खाक; कुटुंबाचा संपूर्ण संसार राख.
धगधगत्या आगीत क्षणात होत्याचं नव्हतं! मिरजेत घर जळून खाक; कुटुंबाचा संपूर्ण संसार राख.
--------------------------------मिरज शहरातील डोंणगे गल्ली परिसरात शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार काही क्षणांत राख झाला. घरातील कपडे, धान्य, लॅपटॉप, रोख रक्कम, मुलांचे शालेय साहित्य, फ्रीजसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने हिरेमठ कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे.
माहितीनुसार, संतोष हिरेमठ यांच्या घराला शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्या वेळी घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते आणि घराला कुलूप लावलेले होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, फ्रीजमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत कारणाचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत.
आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण घराला विळखा घातला. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.
मिरज महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान रोहित निकम आणि सचिन जगताप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य पूर्णपणे जळून गेले होते.
संतोष हिरेमठ हे खासगी रुग्णालयात नोकरी करत असून ते कामावर असतानाच ही दुर्घटना घडली. आगीत झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे कुटुंबासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.
या दुर्घटनेनंतर हिरेमठ कुटुंबाला तातडीच्या मदतीची गरज असून, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

No comments: