Header Ads

शिवाजी चौक परिसरात धोकादायक इमारतीची भिंत कोसळली; मोठी दुर्घटना टळली.

 शिवाजी चौक परिसरात धोकादायक इमारतीची भिंत कोसळली; मोठी दुर्घटना टळली.

----------------------------------

प्रतिनिधी : रहिम पिंजारी.

----------------------------------

कोल्हापूर, दि. २८ जून : शहरातील शिवाजी चौक परिसरातील रफीक दार गल्ली येथे रविवारी एका धोकादायक आणि जीर्ण झालेल्या इमारतीची मागील बाजूची भिंत अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर महानगरपालिकेने तिला 'धोकादायक इमारत' म्हणून घोषित करत रहिवाशांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

असे असतानाही या इमारतीत काही कुटुंबे वास्तव्यास असून, इमारतीतील काही गाळे आणि दुकानेही सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भिंत कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील बाजूची भिंत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी इमारतीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने संबंधित रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले असून, शहरातील इतर धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे धोकादायक इमारतींच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

No comments:

Powered by Blogger.