दारूच्या व्यसनाचा वाद ठरला जीवघेणा? झोपेतच पतीचा गळा आवळून खून; पत्नी व कथित प्रियकराला अटक...
दारूच्या व्यसनाचा वाद ठरला जीवघेणा? झोपेतच पतीचा गळा आवळून खून; पत्नी व कथित प्रियकराला अटक...
------------------------सांगली शहरात एका तरुणाच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. सुरुवातीला बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले; मात्र तपासात पत्नीने कथित प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोल मळा परिसरात राहणारा आनंदा हणमंत सजें (वय २८) याचा २५ जून रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पत्नीने आणि नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मृताची पत्नी पल्लवी आनंदा सजें (वय २२) आणि तिचा कथित प्रियकर दिपक आप्पासाहेब आजमाने (वय २१) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत दोघांनीही आनंदा सजें याला दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासातून मार्ग काढण्यासाठी झोपेत असताना त्याचे पाय ओढणीने बांधून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर तो बेशुद्ध पडल्याचा बनाव करून रुग्णालयात नेण्यात आल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकाने केली.

No comments: