Header Ads

अनाधिकृत बांधकामास जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून झालेली बांधकामे जमीनदोस्त करा: विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे मागणी

अनाधिकृत बांधकामास जबाबदार  अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून झालेली  बांधकामे जमीनदोस्त करा: विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे मागणी.

----------------------
 शशिकांत कुंभार 
----------------------

गांधीनगर:- कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण विभागाच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे झालेल्या ४२ गावातील अनाधिकृत विनापरवाना बांधकामावर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना.अण्णा बनसोडे यांना गांधीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी  दिले.

२०१७ मध्ये ४२ गावांच्या सुनियंत्रित व विकासात्मक धोरणासाठी प्राधिकरण ची निर्मिती करण्यात आली. पण गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, मुडशिंगी व उचगाव  या गावातील काही बांधकाम धारकांनी संबंधित विभागाची परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामे पूर्ण केली आहेत. परिणामी अधिकाऱ्यांनीही कागदी घोडे नाचवत त्यांच्यावर जुजबी कारवाई करत बांधकाम धारकांना पाठबळ देण्याचे काम केले आहे.

दरम्यान अंदाजे दोनशेहून अधिक अनाधिकृत बांधकामे असताना प्राधिकरण विभागाने केवळ ४० बांधकाम धारकावर फौजदारी गुन्हे दाखल केले.६२ बांधकामांचे दावे न्यायालयात प्रलंबित असतानाही बांधकामे पूर्ण झाले आहेत. प्राधिकरण विभाग न्यायालयात आपली बाजू मांडण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यानेच ही बांधकामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. प्राधिकरणच्या डोळेझाक पणामुळे शासनास मिळणारा कोट्यावधीचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे अनाधिकृत बांधकामांना पाठबळ देणाऱ्या प्राधिकरण विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि झालेली बेकादेशीर बांधकामे जमीनदोस्त व्हावी अशी मागणी ही या निवेदनाद्वारे केली.

दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांनी याबाबतची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले. यावेळी समतावादी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कांबळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे,  सागर चावला, दीपक पोपटानी, ओंकार गायकवाड,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


फोटो ओळ:- कोल्हापूर नागरि क्षेत्र विकास प्राधिकरण विभागाच्या क्षेत्रात अनाधिकृत बांधकामास जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून झालेली बांधकामे जमीनदोस्त करा या मागणीची निवेदन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात आले.




.

No comments:

Powered by Blogger.