Header Ads

इंस्टाग्रामवरील ओळख ठरली घातक,, अल्पवयीन मुलीवर अत्याचार,,करवीरच्या तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

 इंस्टाग्रामवरील ओळख ठरली घातक,, अल्पवयीन मुलीवर अत्याचार,,करवीरच्या तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्याचाच गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 20 वर्षीय आरोपी जीवन चव्हाण राहणार.पाडळी खुर्द, तालुका करवीर, याच्याविरुद्ध इस्पुर्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने सातत्याने तिला मोबाईलवर संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. 

फिर्यादीनुसार, शालेय क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे आलेल्या पीडितेला आरोपीने मोटारसायकलवरून जय लॉज येथे नेले. तेथे तिच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर पीडिता मानसिक धक्क्यात होती. तिच्या वागण्यात बदल झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी पीडितेने संपूर्ण प्रकार घरी सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी इस्पुर्ली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत. 

दरम्यान, या प्रकरणात समोर आलेल्या जय लॉजबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या लॉजच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या ठिकाणी कथित बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याच्या चर्चाही परिसरात रंगत आहेत. तसेच संबंधित लॉज हा सेवानिवृत्त पोलीस यांच्या संबंधित असल्याचीही चर्चा परिसरात असून अस असेल तर जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर लॉजच्या कामकाजासह संपूर्ण प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील परिसरात जोर धरत आहे.

तसेच अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरून होणाऱ्या ओळखींबाबत अल्पवयीन मुलांनी आणि पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

No comments:

Powered by Blogger.